मुंबई : अब की बार डान्सबार आणि अच्छे दिन कोणाचे तर बारमालकांचे! अशी सणसणीत टीका करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. डान्सबार बंदीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली.काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने विधानसभेत डान्सबार बंदीचा निर्णय घेतला तेव्हा एकमताने सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा दिला होता. ज्या वेळी हा खटला न्यायालयात सरकारच्या विरोधात गेला तेव्हा तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने गृहपाठ नीट केला नाही आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती नसल्याने आघाडी सरकारने न्यायालयात नीट बाजू मांडली नाही, असे आरोप केले होते, याची आठवण राज यांनी करून दिली. तसेच आता काय झाले? तुमचा गृहपाठ कुठे कमी पडला? की तुमचीही डान्सबार बंद करण्याची इच्छाशक्ती नाही? की तुमचे बारमालकांसोबत काही संगनमत झाले आहे? असे बोचरे सवालही त्यांनी केले. अनेक खटल्यांचे निकाल लागत नाहीत. त्यावर सामान्य माणूस हैराण होऊन जातो; मात्र डान्सबारसारख्या विषयावर इतक्या झटपट निर्णय कसा लागतो? सरकार जितकी आस्था डान्सबार सुरू होण्याबाबत दाखवते तशीच त्यांनी इतर विषयांवरही दाखवली तर जनता त्यांना मनापासून दुवा देईल, असेही राज ठाकरे म्हणाले.
अब की बार डान्सबार!
By admin | Published: March 06, 2016 3:29 AM