मुंबई : बेस्ट उपक्रमाची ओळख ठरलेला ऐतिहासिक लाल रंग लवकरच उडणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला ‘अच्छे दिन’ यावेत, यासाठी अनेक नवे बदल केले जाणार आहेत. या बदलास मुंबईकरांनी स्वीकारल्यास, पांढऱ्या व पिवळ्या रंगात बेस्टच्या बसगाड्या रंगून निघणार आहेत.सार्वजनिक वाहतूक, मोनो-मेट्रो, शेअर रिक्षा-टॅक्सीच्या स्पर्धेत मागे पडलेल्या बेस्टपुढे तिकिटाद्वारे मिळणारे उत्पन्न हाच उत्पन्नाचा प्रमुख मार्ग. भाडेवाढीचा मार्ग अवलंबल्यास प्रवाशी संख्या कमी होत असल्याने, बेस्टने आता नवीन प्रयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याची तयारी केली आहे. यात बसगाडीला नवीन रंग, गाडीमध्ये व बस स्टॉपवर मोफत वाय-फाय सेवा, गाडीची वेळ व अन्य माहिती देणारे मोबाइल अॅप आदी मार्ग अवलंबण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून बसगाडीचा रंग बदलण्याच्या हालचालीही होताना दिसत आहेत. अशा दोन बसगाड्या बेस्टच्या कुलाबा येथील भवनाच्या आवारात दिमाखात उभ्या आहेत. जे. जे. इन्स्टिट्यूट आॅफ अॅप्लाइड आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या दोन बस गाड्या आहेत. पिवळ्या व पांढऱ्या रंगातील या बसगाड्या तयार झाल्या की, प्रवाशांच्या पसंतीसाठी रस्त्यावर धावतील. पुढील सहा महिन्यांत प्रवाशी, बस चालक आणि वाहक व मेकॅनिककडून प्रतिसाद घेऊन, इतर बसेसही याच रंगाच्या असाव्यात का, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)रंग बदलण्यास विरोधलाल रंगाची बसही बेस्टची ओळख आहे. रंगात बदल केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत, बसचा रंग बदलण्यास बेस्ट समिती सदस्यांनी विरोध केला आहे. पांढऱ्या रंगाचा बेरंग होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली आहे.या आधी उपनगरीय रेल्वे गाड्यांचा रंग बदलून, मरून रंगाचा पिवळा, पांढरा व जांभळा रंग करण्यात आला.बेस्टच्या ताफ्यात ३८०० बस गाड्या असून, १२० डबल डेकर बस गाड्या आहेत. वातानुकूलित २६६ बस गाड्या वगळून, उर्वरित बहुतांशी बसेस लाल रंगाच्याच आहेत.- बेस्टने आता नवीन प्रयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याची तयारी केली आहे. यात बसगाडीला नवीन रंग, गाडीमध्ये व बस स्टॉपवर मोफत वाय-फाय सेवा, गाडीची वेळ व अन्य माहिती देणारे मोबाइल अॅप आदी मार्ग अवलंबण्यात येणार आहेत.- बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांतून १० वर्षांपूर्वी ४२ लाख प्रवाशी प्रवास करत. ही संख्या आता २९ लाखांवर आली आहे.जे. जे. आर्टच्या पाच विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मदतीने बसेसच्या नवीन - रंगाचे नियोजन केले आहे. १९६० मध्ये जे. जे.च्याच विद्यार्थी व प्राध्यापकांनी बसचा लोगो तयार केला होता. यामध्ये बल्बच्या आत बस दाखवण्यात आली आहे.
आता बेस्ट बसगाड्यांचा लाल रंग उडणार
By admin | Published: April 22, 2017 3:25 AM