मुंबई : म्हाडा प्राधिकरणाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाचा तिढा सरतेशेवटी राज्य सरकारने सोडवला आहे. उच्च उत्पन्न गट वगळल्यास अल्प, अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ वाढणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशच राज्य सरकारने काढला आहे. आता वाढत्या क्षेत्रफळानुसार घरांच्या किंमतींमध्येही वाढ होणार आहे. असे असले तरी आता मोठ्या आकाराचे घर मिळणार असल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. या निर्णयामुळे भविष्यात बांधण्यात येणारी अत्यल्प गटातील घरे ३२३ चौरस फूट, अल्प गटातील घरे ६४६ चौरस फूट तर मध्यम उत्पन्न गटातील घरे ८६१ चौरस फुटांची असतील. उच्च उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ मात्र तेवढेच राहणार आहे. म्हाडा प्राधिकरणातर्फे ३१ मे रोजी घरांची सोडत काढण्यात येणार होती. मात्र सोडतीसाठी घरांची संख्या पुरेशी नसल्याने सोडती लांबणीवर पडली. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी म्हाडा मुख्यालयात पत्रकार परिषद घेत ९७० घरांची सोडत काढण्यात येईल, अशी माहिती दिली. प्रत्यक्षात सोडत कधी काढण्यात येईल? याबाबत म्हाडाकडून अद्यापही गुप्तता पाळण्यात येत असतानाच ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाचा तिढा सरतेशेवटी राज्य सरकारने सोडवल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. वाट पाहणाऱ्या नागरिकांना मात्र आता आणखी वाट पाहवी लागणार आहे. कारण आर्थिक उत्पन्न गटाचे निकष नव्याने जाहीर झाले आहेत. परिणामी नव्याने जाहीर झालेले निकष यंदाच्या सोडतीसाठी लागू होणार की नाही, याबाबतचा ठोस निर्णय मात्र अद्यापही झालेला नाही. त्यामुळे ९७० घरांच्या सोडतीबाबतचा संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)
म्हाडाकडून आता मिळणार मोठे घर
By admin | Published: June 21, 2016 3:35 AM