पुणे : रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात पुणे शहरातील भवानी पेठ व वानवडी येथील रेशनिंग दुकानात पॉझ मशिन बसवून येत्या आठ दिवसांत करण्यात येणार आहे. कुटुंबप्रमुख अथवा सदस्यांचे बोटाचे ठसे घेऊनच धान्य मिळणार असल्याने रेशनकार्ड आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने गरीब कुटुंबाला स्वस्त दरामध्ये रेशनिंगवर धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु यामध्ये तब्बल ४० टक्के धान्याचा काळाबाजार होतो. धान्य आले नाही, कमीच आले, अशी कारणे देऊन रेशनिंग दुकानदार गरीब लोकांची पिळवणूक करून त्यांच्या वाट्याच्या धान्याची काळाबाजारात विक्री केली जाते. त्यात तीन व दोन रुपये किलो दराने धान्य मिळायला लागल्याने रेशनिंग दुकानातून पोतीच्या पोती थेट काळ््याबाजारात जाऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शंभर टक्के रेशनकार्ड आधार लिंक करून सर्व डेटा संगणकीकृत करण्यात आला आहे. आता राज्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांना पॉझ मशिन देऊन रेशनिंगवर मिळणारे सर्व धान्य बायोमेट्रिक पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
आता बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप
By admin | Published: January 05, 2017 3:36 AM