अजित मांडके,
ठाणे- मुंबईतील युतीची बोलणी अद्याप अपूर्ण असल्याने ठाण्यातील युतीची बोलणीही थांबली आहेत. त्याचवेळी भाजपाने गुप्तचर यंत्रणेमार्फत केलेल्या सर्व्हेत एकटे लढल्यास ठाण्यात पक्षाच्या जागा ८ वरून जास्तीत जास्त २५ पर्यंत वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, आता परस्परांविरुद्ध लढून कटुता वाढवण्यापेक्षा युती करुन लढण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. मुंबईत काही जागांवरून युतीची बोलणी अडली आहे. युती करायची तर सगळीकडे करा, असा शिवसेनेचा प्रथमपासून आग्रह आहे. त्यामुळे मुंबईतील बोलणी पुढे सरकल्यानंतरच ठाण्यातील युतीची बोलणी सुरू करण्याचा निर्णय ठाण्यातील शिवसेनेने घेतला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा युतीला विरोध असला तरी युती न झाल्यास प्रचारात परस्परांवर चिखलफेक करुन पुन्हा सत्तेकरिता एकत्र यायचे तर त्यापेक्षा कटुता टाळून अगोदरच युती करावी, असे भाजपाच्या काही बड्या नेत्यांचे मत आहे. ठाण्याचा निर्णय घेण्यासाठी यापूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर यांच्या स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र या दोघांनीही युतीस विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीकरिता अनुकूल असून त्यांच्या सूचनेवरुन काही बड्या नेत्यांनी ठाण्यातील निवडणुकीत लक्ष घातले आहे. डोंबिवलीचे आमदार तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार कपिल पाटील यांच्या कोर्टात युती करायची किंवा कसे याचा चेंडू पडला आहे. मध्यंतरी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री चव्हाण यांच्यात युतीबाबत गुफ्तगू झाल्याची चर्चा होती. चव्हाण व पाटील यांनी युतीला अनुकूल भूमिका घेत कटुता टाळण्याचा आग्रह धरला आहे.भाजपाचा सर्व्हे नेमके काय सांगतो?भाजपाने मुंबई आणि ठाण्यात गुप्तचर यंत्रणेमार्फत आणि खासगी यंत्रणेमार्फत सर्व्हे केल्याची माहिती आहे. या सर्व्हेच्या आधारावर भाजपाच्या ठाण्यात किती जागा वाढू शकतात, याचे चित्र पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळीपुढे मांडण्यात आले आहे. शिवसेनेबरोबर युती झाल्यास ठाण्यात भाजपाच्या २५ जागा निवडून येणार आहेत. स्वबळावर लढल्यास सध्याच्या ८ जागांमध्ये आणखी १० जागांचीच भर पडून पक्ष फारतर १८ जागांपर्यंत कशीबशी मजल मारू शकतो, असा या सर्व्हेचा निष्कर्ष आहे.