मुंबई : भूकंपामुळे इमारत कोसळून हानी होऊ नये, म्हणून आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्याने भूकंपरोधक इमारतीबाबत केलेल्या संशोधनाला अडीच वर्षांनंतर यश आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात ‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले जात आहे. पीएच.डीचा अभ्यास करणाऱ्या अमित गोयल याने तयार केलेला ‘अर्थक्वेक रेझिस्टंट ब्लॉक मॅसनोरी सीस्टिम’ हा संशोधनात्मक प्रकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.संशोधनात्मक प्रकल्पांना भेटी देणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात विद्यार्थी आणि व्यावसायिकांचाही समावेश आहे. अमितने ही भूकंपरोधक इमारत उभारण्यासाठी भंगारच्या दुकानातील रबरी टायर विकत घेतले. त्यांचे चार इंच आकाराचे तुकडे केले आणि चार इंच लोखंडी प्लेट्सना ते चिकटवले. या तुकड्यांनी इमारतीला बांधून ठेवता यावे म्हणून त्याने त्याच आकाराची छिद्र असलेले सिमेंट ब्लॉक तयार केले. त्यानंतर हे तुकडे सिमेंट ब्लॉकमधील छिद्रांमध्ये गुंतवत दुमजली इमारत उभी केली. सहा रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूंकप आला तरी द्वारे बांधलेली इमारत कोसळणार नाही; असा ढाचा त्याने तयार केला. या संशोधन प्रकल्पाचा तपासणीवेळी मालवाहू वॅगन्स इमारतीवर अतिवेगाने आदळण्यात आले. एकमजली आणि दुमजली अशा दोन्ही भूकंपरोधी इमारतींवर हा प्रयोग करण्यात आला. वॅगन्स जेव्हा-जेव्हा इमारतीवर अतिवेगाने आदळले, तेव्हा-तेव्हा इमारतीचे केवळ प्लॅस्टर निखळले. उर्वरित ढाचा मात्र कायम राहिला. अशा प्रकाराची तपासणी तीन ते चार वेळा करण्यात आली. सहा किंवा आठ रिश्टर स्केलच्या भूंकपावेळीही हे बांधकाम किती मजबूत राहील, हे पाहणे हा तपासणीमागील उद्देश होता, असे गोयल याने सांगितले.
आता भूकंपातही टिकणार इमारत
By admin | Published: February 18, 2016 6:32 AM