सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणाचे सीआयडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून या हत्येची न्यायालयामार्फतही चौकशी सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सहा जणांची न्यायालयीन सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबुल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी पोलिसांनी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. या प्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दिन मुल्ला व झाकीर पट्टेवाले यांना अटक झाली आहे. त्यांना १ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.सीआयडी ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार आहे. संशयिताचा कोठडीत मृत्यू झाल्यास न्यायालय स्वतंत्रपणे चौकशी करून वरिष्ठ न्यायाधीशांना अहवाल सादर करते. त्यानुसार चौकशी सुरू झाली असून काहींना जबाबासाठी नोटिसाही बजाविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सीआयडीने आतापर्यंत ५४ जणांचे जबाब नोंदविले आहेत. कॉल डिटेल्स हाती आल्यानंतर सीआयडीने तपासाला गती दिली.
अनिकेत कोथळेच्या हत्येची आता न्यायालयीन चौकशी, अहवाल वरिष्ठ न्यायाधीशांना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:10 AM