- महेश चेमटे मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे. मध्य रेल्वेच्या ५५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.
स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट कार्यान्वित होणार आहे. यापैकी जुलै २०१७ पर्यंत ५५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.
बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्याजागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टिल बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटचे संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचा देखील योग्य वापर होतो. परिणामी पाण्याचे संवर्धन देखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.