बुलडाणा : मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई मार्गावर, रेल्वे गाड्यांचे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रत्येक स्थानकापासून एक किलोमीटर अंंतरावर ‘इलेक्ट्रॉनिक अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ लावण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे रेल्वेमार्गावर काम करणारे कर्मचारी किंवा रेल्वेरूळ ओलांडू बघणाऱ्या पादचाऱ्यांंना त्या मार्गावर रेल्वे येत असल्याची आगाऊ सूचना मिळणार आहे.रेल्वेमार्गावर काम करणाऱ्या गँगमनचे अपघात तसेच इतर अपघाती मृत्यू ही चिंतेची बाब बनली आहे. त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक विद्युत उपकरण तयार केले आहे. प्रत्यक्ष रेल्वेमार्गावर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांंना गाडी एक किलोमीटर दूर असतानाच तिच्या आगमनाची सूचना देण्याचे काम हे उपकरण करणार आहे. मध्य रेल्वेचे नागपूरस्थित जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी या प्रणालीवर काम सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या गँगमन रेल्वेमार्गावर काम करीत असताना त्यांच्या गँगमधील दोन कामगार दोन टोकांना हातात झेंडा घेऊन उभे राहतात. गाडी आल्यानंतर ते हातातील झेंड्याच्या साहाय्याने चालकाला गाडी हळू नेण्याचा इशारा देतात़ बरेचदा ही पद्धत तेवढी प्रभावी ठरत नाही. (प्रतिनिधी)
आता मध्य रेल्वे देणार ‘अपघात अॅलर्ट’!
By admin | Published: November 06, 2014 3:51 AM