मुंबई : सरकारी व खासगीतील नोकरी,परदेशात जाण्यासाठी आवश्यक बनलेले चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांच्या विशेष शाखेत (एसबी-१) मध्ये घालावे लागणारे हेलपाटे आता कायमस्वरुपी बंद होणार आहेत. आता ते ‘आॅनलाईन’ घरबसल्या मिळविता येणार आहेत,तेही नोंदणी केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसात. मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका तरुणाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ‘डिजिटल’स्वरुपात वितरित केले.चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी www.pcs. mahaonline.gov.in व www.aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेत स्थळावरुन एसबी-१च्या ग (जी) शाखेतर्गंत अर्ज करुन त्यासाठीचे शुल्क आॅनलाईन भरावे लागले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याकडून अहवाल आल्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या ईमेल आयडीवर प्रमाणपत्राची डिजीटल प्रत पाठविली जाईल. आठ ते दहा दिवसांत ही कार्यवाही केली जाईल, यासाठी यापूर्वीच्या पद्धतीनुसार ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागत होता, असे या शाखेचे प्रभारी अप्पर आयुक्त आर.डी.शिंदे यांनी सांगितले. आतापर्यत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई किंवा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करुन त्यांची प्रत विशेष शाखेच्या कार्यालयात सादर करावे लागत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या तारखेला पुन्हा कार्यालयात येऊन अर्ज व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागत होती. ही प्रक्रिया झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र नव्या प्रणालीनुसार आता नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला कार्यालयात जावे लागणार नाही. केवळ ते रहात असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जावे लागेल, त्याचप्रमाणे संबंधित ठाण्यातील पोलीस घराची शाहनिशा करण्यासाठी येतील. (प्रतिनिधी)> आॅनलाइन प्रमाणपत्र असे मिळणार अर्जदाराला पहिल्यादा वेबसाईटवर मोबाईल क्रमांक ,पासवर्ड वापरुन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करुन आॅनलाईन फार्म भरावा लागेल.मोबाईलवर आलेल्या तारखेला संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित रहावे लागेल, त्यांच्याकडून २/३ दिवसामध्ये पडताळणीचा अहवाल आॅनलाईन अपलोड केल्यावर ग शाखेच्या लॉगइनवर दिसेल. शाखेकडून पडताळणी करुन अर्जदाराचे प्रमाणपत्र डिजीटल सहीद्वारे तयार करुन त्याबाबत अर्जदाराला कळविला जाईल. त्यानंतर मेलवरुन त्याने डाऊनलोड करुन त्याची प्रत काढून घ्यावी लागेल. वर्षाला ८० हजार अर्जचारित्र्य पडताळणीसाठी दरवर्षी शहर व उपनगरातून सरासरी ८० हजार अर्ज विशेष शाखेत केले जातात. त्यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाते. मात्र कार्यालयात ये-जा करण्याबद्दल किमान ४०० ते ५०० रुपये खर्च येतो, त्याशिवाय २,३ महिने प्रतिक्षा करावी लागत असे. आता आॅनलाईन प्रणालीमुळे नागरिकांचा हा त्रास कमी होणार असल्याचे उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.
आता घरबसल्या चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र
By admin | Published: May 13, 2016 3:57 AM