ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भुमिका घेत केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले आहे. केंद्राने आता तरी शब्दांचे खेळ बंद करावेत व जिहादी दहशतवाद्यांना संपविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, या शब्दांत केंद्राला धारेवर धरले आहे. काश्मीरमध्ये केंद्राच्या अपयशी धोरणांमुळे जिहादी हल्ले वाढले असून अमरनाथ हल्लादेखील त्यातूनच झाल्याचा आरोप विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी लावला आहे.
या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विहिंपतर्फे पत्रक जारी करण्यात आले. देशात सातत्याने दहशतवादी कारवाया वाढत आहेत. त्यामुळे अशा तत्वांशी किंवा त्यांना समर्थन करणाºयांशी चर्चा करणे बंद केले पाहिजे. जर शासनाने आत्ताच पावले उचलली नाही तर संपूर्ण भारतात अशा प्रकारे जिहादी कारवाया वाढतील, असे डॉ.तोगडिया यांनी या पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे. जिहादी दहशतवाद्यांना आश्रय देणारे स्थानिक लोक, संस्था यांच्यावर कारवाई व्हावी तसेच त्यांचे आर्थिक स्त्रोत नष्ट करण्याबाबत केंद्राने ठोस धोरण तयार केले पाहिजे. संपूर्ण काश्मीर हा भारताचाच आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात यावे तसेच पाकिस्तान व चीनशी चर्चा बंद केली पाहिजे, अशी मागणी डॉ.तोगडिया यांनी केली आहे.
विदेशांमध्ये दहशतवादावर बोलायचे आणि देशात मात्र कृती करायची नाही, हे अयोग्य आहे, या शब्दांत डॉ.तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता टीका केली आहे.