लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नगरसेवक आबा बागुल यांच्याविरोधात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता बागुल यांनीही मुंढे यांच्याविरोधात कंपनी रजिस्ट्रार कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. कंपनी कायद्यानुसार भागभांडवल धारकांनी माहिती मागितल्यानंतर ती देणे बंधनकारक असतानासुद्धा मुंढे यांनी त्याला नकार दिला, असे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.मुंढे यांनी भेटण्यासाठी म्हणून बागुल सोमवारी पीएमपीच्या कार्यालयात गेले होते. तिथे मुंढे यांनी आपल्याला विनाकारण बाहेर बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना महापालिकेने केलेल्या ‘महिन्यातून एक दिवस पीएमपीचा प्रवास विनामूल्य’ या ठरावाचे काय झाले, याची विचारणा केली. त्याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. तिथूनच आपण महापौर मुक्ता टिळक यांना मोबाईल केला, त्या वेळी मुंढे यांनी त्यांच्याशीही बोलणे टाळले. ‘नंतर सांगतो’ असे उत्तर देऊन फोन ठेवून दिला.हा सर्व प्रकार कंपनी कायद्यात असलेल्या तरतुदींच्या विरोधात असल्याचे बागुल यांनी डेक्कन येथील कंपनी रजिस्ट्रार कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कंपनी कायद्यात भागभांडवल धारकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कसे वागायचे, याचे नियम आहेत. सीईओपासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना हे नियम लागू आहेत. मुंढे कंपनीचे संचालक नाहीत, तर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.महापालिका कंपनीची सर्वाधिक मोठी भागभांडवल धारक आहे. नगरसेवक या नात्याने आपण मागितलेली माहिती देणे त्यांच्यावर कायद्याने बंधनकारक आहे, असे असताना त्यांनी त्याला नकार दिला, असे बागुल यांचे म्हणणे आहे.
आता बागुल यांची मुंढे यांच्याविरोधात तक्रार
By admin | Published: July 12, 2017 1:10 AM