मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप रखडला आहे. काँग्रेसला मनासारखे खाते मिळाले नसल्यामुळे हा विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी यावर तोडगा निघेल अशी शक्यता असली तरी काँग्रेसला आता उपमुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर काँग्रेस समाधानी नाही. महत्त्वाच्या खात्यांपैकी केवळ महसूल काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. याशिवया उर्जा, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन अशी खाती काँग्रेसला मिळणार आहेत. त्या तुलनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चांगली खाती येणार आहेत.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदामुळे काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडला होता. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित मानले जात होते. मात्र नवीन रचनेत गृहखातं राष्ट्रवादीने घेतलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा स्थितीत काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असून तसा दावा करण्यात येत आहे.
खातेवाटपात मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये काँग्रेसला बदल करून हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेले खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरू असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं आहे. त्यावर आता महाविकास आघाडीत काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.