मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटून गेल्यानंतर तसेच अनेक संकटे बाजुला सारत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. अजित पवार यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावून सरकार स्थापन्याची हालचाल केल्याने महाविकास आघाडी फिस्कटल्याचे चित्र होते. त्यावेळी आघाडी फिस्कटण्यास काँग्रेसचा संथ कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात होते. आता मंत्रीपदांचे वाटप करण्यातही काँग्रेसकडून तसाच विलंब होत असल्याची चर्चा मित्रपक्षांमध्ये सुरू आहे.
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढले होते. तर शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे शिवसेना-भाजपने सरकार स्थापने आपेक्षीत होते. मात्र शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीमुळे युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने नवीन मित्र शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सेनेला आधी राष्ट्रवादीची साथ मिळाली. मात्र बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक होता. त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र काँग्रेसकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता.
दरम्यान अनेक संकटानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि काँग्रेसला 13 मंत्रीपदं देण्याचं ठरल आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकला नाही.
मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. त्यातच अधिवेशन जवळ आले असून पहिल्या अधिवेशनाला सरकार सहा मंत्र्यांवरच सामोरे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.