सुशांत मोरे,मुंबई- खासगी वाहतूकदारांकडून निर्माण केलेली स्पर्धा पाहता, आता एसटी महामंडळानेही प्रवाशांसाठी खासगी वाहतुकीप्रमाणेच अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या प्रवाशाने तिकीट आरक्षित केल्यानंतरही त्याला काही कारणास्तव ती बसही पकडता येत नाही किंवा वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे एसटीच्या नियोजित ठिकाणाहून बस पकडणाऱ्या अशा प्रवाशांना बसची माहिती आधीच मिळावी, यासाठी वाहकाकडूनच प्रवाशाला मोबाइलवर संपर्क साधला जाणार आहे, तसेच प्रवाशालाही बस वाहकाचा नंबर आणि नाव मोबाइलवर एसएमएस केला जाईल. एसटी महामंडळाकडून तिकीट काढण्यासाठी आॅनलाइन सेवाही प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे. तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना आरक्षित तिकिटाचा मेसेज येतो. त्यानंतर, बस सुटण्याआधी एक तास अगोदरही पुन्हा माहिती दिली जाते. मात्र, आता यात बदल करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने आखला असून, त्यावर कामही सुरू आहे. हे दोन्ही मेसेज देतानाच महामंडळाने गाडी नंबर, वाहकाचा मोबाइल नंबर व त्याच्या नावाचा मेसेजही प्रवाशांना मोबाइलवर दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवासी बस सुटण्याआधी वाहकाला फोन करून आपण ‘त्या’ बसचे प्रवासी असल्याची माहिती देईल आणि पोहोचत असल्याचेही प्रवाशाकडून वाहकाला सांगितले जाईल. त्यामुळे एखाद्या कारणास्तव बस पकडण्यास उशीर होत असेल, तर प्रवाशाला यामुळे बस पकडता येईल, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, एसटी वाहकाकडेही प्रवाशांचे मोबाइल नंबर दिले जातील. एखादी बस सुरुवातीच्या स्थानकातून सुटल्यानंतर, अन्य मधल्या स्थानकांतूनही एसटीचे प्रवासी असतील, तर त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच वाहकाकडून प्रवाशाच्या मोबाइलवर संपर्क साधून बस पोहोचत असल्याची माहिती दिली जाईल. यामुळे प्रवासी आणि वाहकांत संवाद राहिल्यास प्रवासी न घेताच बस सुटण्याचे प्रकारही थांबतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.यावर सध्या काम सुरू असून, ही यंत्रणा लवकरच येईल. त्यासाठी वाहकांनाही याचे प्रशिक्षण दिले जाईल, तर वाहक नसलेल्या ठिकाणी चालकालाही ही सेवा राबवावी लागेल.आॅनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्यांबरोबरच तिकीट खिडक्यांवरही तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
आता वाहक साधणार प्रवाशांच्या मोबाइलवर संपर्क
By admin | Published: March 02, 2017 5:44 AM