पणजी : गोवा सीमेवरील महाराष्ट्र व कर्नाटकमधील जिल्ह्यांतील वाहनांनाही आता प्रवेश शुल्क भरावा लागणार आहे, असे गोव्याचे बांधकाम तसेच वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. जून महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा गोवा सरकारचा विचार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गोव्यातील वाहनांनाही परप्रांतात गेल्यानंतर पुन्हा गोव्यात प्रवेश करताना शुल्क लागू करावे, असे तत्त्वत: ठरवून त्याबाबतची मसुदा अधिसूचनाही जारी केली आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यावर बोलताना ढवळीकर म्हणाले, गोव्यात नोंद झालेल्या वाहनांना प्रवेश शुल्क लागू करू नये, असे मलाही वाटते. बेळगाव, सिंधुदुर्ग व गोव्याला लागून असलेल्या परराज्यातील वाहनांना आम्ही प्रवेश शुल्क लागू केले नव्हते. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे. गोव्यातील वाहनांना प्रवेश शुल्क लागू करावे की नाही, याविषयी लोकांनी मतप्रदर्शन करावे, या हेतूने मसुदा अधिसूचना जारी केली आहे. लोकांच्या सूचनेनंतर गोव्यातील वाहनांना शुल्कातून वगळले जाईल. तसा बदल अंतिम अधिसूचनेत करण्यात येईल. (खास प्रतिनिधी)
गोवा सीमेवरील जिल्ह्यांतील वाहनांनाही आता प्रवेश शुल्क
By admin | Published: May 13, 2014 8:18 PM