- सुरेंद्र राऊतयवतमाळ : एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला असून भावी डॉक्टरांना पेशंटशी कसे वागावे याचे आणि एकूणच नैतिकतेचे धडेही अभ्यासावे लागणार आहेत. २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे.भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून (एमसीआय) वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची रचना केली जाते. एमसीआयच्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यासक्रमात फेरबदल सुचविले आहेत. अभ्यासक्रमातील मूळ संकल्पना कायम असून त्यामध्ये अॅटकॉम मोडचा अंतर्भाव केला आहे. यातून विद्यार्थीदशेपासूनच डॉक्टरांना अॅटिट्यूड, इथिक्स, कम्युनिकेशन शिकविले जाणार आहे. प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्याला प्रत्यक्ष वॉर्डात काम करावे लागणार आहे.पहिल्या १३ महिन्यांत फाउंडेशन कोर्स आहे. यात अभ्यासक्रमाची माहिती, डॉक्टर म्हणून सामाजिक जबाबदारी, कायदा व इथिक्स काय म्हणतात, हे शिकविले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी बायोइथिक्स, तिसऱ्या वर्षी ‘मेडिको लीगल इश्यूज’ आणि डॉक्टर व पेशंटमधील संवाद, चौथ्या वर्षी ‘मेडिकल निग्लीजेन्सी अॅण्ड डेथ’ याबाबत सविस्तर शिकविण्यात येणार आहे. शेवटच्या वर्षी ‘इलेक्टिव पोस्टिंग’ हा वेगळा दोन महिन्यांचा कोर्स राहणार आहे. यातून वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्या शाखेकडे विद्यार्थ्याचा कल आहे हे निश्चित केले जाणार आहे. खेळालाही महत्त्व देण्यात आले आहे.