मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसह इतर मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा सुरक्षा रक्षक संघटनेने दिला आहे.
माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर वाघमारे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून अनेक संघटना सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहेत. तरी मंडळातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही, असेच वागत आहेत. अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे. महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक यंत्रणा एकत्रित कराव्या, जेणेकरून शासनाचा अंकुश सर्व जागी राहील.
‘प्रतीक्षा यादीतील सुरक्षा रक्षकांना नोकरी द्या’रायगड व पुणे जिल्ह्यात भरती करण्यात आली होती, तसेच इतर सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना आस्थापणेने बेरोजगार केले आहे. जे आता वेटिंग लिस्टवर आहेत अशा सुरक्षा रक्षकांना मंडळाने इएसआयसी कडील बेरोजगार भत्ता मिळवून द्यावा आणि तत्काळ नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रसाद मोरे यांनी केली.
महाराष्ट्र शासनात मंडळांचे विलीनीकरण होईपर्यंत मंडळाकडून गणवेश आणि इतर असेम्बली साहित्यासाठी निविदा काढण्यात येतात. त्या निविदा घेणाऱ्या कंपन्या सुरक्षा रक्षकांना उच्च दर्जाचे गणवेश, असेम्बली देण्यास असमर्थन दिसत असल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून त्यावर लेव्हीमधील टक्केवारी प्रमाणे खर्च होणारी रक्कम सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यात जमा करावी. जो सुरक्षा रक्षक गणवेश आणि इतर गोष्टी नित्यनेमाने आणि व्यवस्थित परिधान करत नसेल त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून जनमाणसात मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची प्रतिमा चांगली दिसेल आणि मंडळाकडे आस्थापना नोंदी वाढतील. - अभिलाष डावरे, संघटनेचे कार्याध्यक्ष.