मुंबई : दलालांना रोखण्याचे उद्दिष्ट ठेवत रेल्वे मंत्रालयाकडून तिकीट आरक्षण सेवा ६0 दिवसांवरून १२0 दिवस करण्यात आली. एप्रिलच्या पहिल्याच दिवशी आरक्षणाचा नवा नियम लागू होताच देशभरातील तिकीट आरक्षण दुपटीने वाढले आणि १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटे आरक्षित झाली. मात्र या नियमामुळे वेटिंग लिस्टचा आकडा वाढण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात असून, त्यामुळे कन्फर्म तिकिटे मिळविताना मारामार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वेची मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे मिळवताना प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. दलालांकडूनच तिकीट आरक्षणात काळाबाजार केला जात असल्यानेच वेटिंग लिस्टचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दलाली रोखण्यासाठी रेल्वेकडून ६0 दिवस अगोदर होणारे तिकीट आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आली. मात्र १ एप्रिलपासून नवा नियम लागू होताच तिकिटांचे आरक्षण दुपटीने वाढले. ६0 दिवस अगोदर तिकीट आरक्षणाच्या नियमामुळे देशभरात जवळपास ५ लाख तिकिटांचे आरक्षण होत असे. परंतु नव्या नियमामुळे हेच आरक्षण १० लाखांपेक्षा अधिक झाले. यापूर्वी ६0 दिवस अगोदर आरक्षण सेवा सुरू होत होती आणि आता त्या नंतरच्याही ६0 दिवस अगोदरच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्याने तिकीट आरक्षणात वाढ झाल्याचे दिल्लीतील आयआरसीटीसीतील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.वाढलेल्या या आरक्षणामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे आणि दलालीही रोखली जाईल, अशी आशा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याच नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वेटिंग लिस्ट कमी करणार कशी, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना दलालांकडेच हात पसरवावे लागणार असल्याची चर्चाही होत आहे. (प्रतिनिधी)
आता वेटिंग लिस्टचा आकडा वाढण्याची भीती!
By admin | Published: April 02, 2015 4:58 AM