डिप्पी वांकाणी , मुंबईपोलीस खात्यातील रिक्त पदांच्या भरतीसाठी एका जागेसाठी १५० पेक्षा अधिक उमेदवार या प्रमाणात अर्ज आल्यामुळे उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खाते करीत आहे. या भरती प्रक्रियेतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले की, जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल.या निर्णयामुळे शारीरिक चाचणी देणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होईल. ४८३३ रिक्त जागांच्या या भरतीसाठी ७ लाख ५८ हजार ७२२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्या पाच जिल्ह्यांतून सर्वाधिक अर्ज आले आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर ग्रामीण आणि पालघर या शहरांचा समावेश आहे. पोलीस खात्यात भरती होताना शारीरिक क्षमता ही महत्त्वाची मानली जाते, त्यामुळेच आतापर्यंत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. भरती प्रक्रियेतील ही पद्धत बदलण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार, प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेण्याचा मुद्दा समोर आला. त्यामुळे शारीरिक चाचणीसाठीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात कमी होतील. अंदाजे ते रिक्त जागांच्या वीसपट अधिक असतील. शारीरिक परीक्षेसाठी यंदा किमान ३० दिवसांचा कालावधी लागेल. शारीरिक क्षमता चाचणीसाठी अधिक वेळ लागतो. कारण समन्वय आणि चाचणीसाठी जागेच्या निवडीपासून ते पूर्वतयारीपर्यंत अनेक बाबींकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक परीक्षा ठेवल्यास तुलनेत ही प्रक्रिया अधिक सोपी आहे. लेखी व शारीरिक परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुण असतील.
पोलीस भरतीसाठी आता प्रथम लेखी परीक्षा
By admin | Published: April 20, 2016 5:36 AM