मुंबई : सत्ता सहभागावरून गेले महिनाभर भाजपा-शिवसेनेत रंगलेले राजकीय नाट्य संपते न संपते तोच आता विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी होत असल्याने रिक्त होणा-या विरोधी पक्षनेते पदासाठी दोन्ही पक्षात चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीचे ४१ आमदार आणि चार पुरस्कृत अशा ४५ आमदारांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधीमंडळ नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.तर, महिनाभर भाजपाच्या वळचणीला बसणा-या राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदावर दाव करण्यापूर्वी सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करावे. न मागता भाजपाला पाठिंबा देणारी राष्ट्रवादी विरोधक म्हणून काम कसे कराणार, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी केला.काँग्रेसचे विधानसभेत ४२ आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. मात्र, विशेष अधिवेशनादरम्यान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेसचे पाच आमदार दोन वर्षासाठी निलंबित झाले. त्यामुळे काँग्रेसचे सदस्यसंख्या ३७ वर आली आहे. याच आधारावर राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा करीत आहे. शिवाय, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या आघाडीच्या आधारे विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. हाच दाखला राष्ट्रवादीचे नेते देत आहेत. मात्र, काँग्रेस आमदारांवर दोन वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली असले तरी त्यांचे सदस्यत्व कायम आहे. त्यामुळे काँग्रेसकडेच विरोधी पक्षनेते पद सोपविणे नियम आणि परंपरेला धरून असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आता आघाडीत रस्सीखेच!
By admin | Published: December 05, 2014 4:01 AM