मंचर : आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली. बुधवारी सकाळी शर्यत सुरू होतानाच न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त धडकले आणि बैलगाडा शौकिनांमध्ये खळबळ उडाली. आता असा सण पुन्हा पाहता येणार नाही, यापुढे अनेकांनी बैलगाडा डोळे भरून पाहून घेतले. सातगाव पठार भागातील कारेगाव येथील यात्रेने तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचा समारोप होतो. या वेळी या यात्रेला भावनिक किनार लाभली. मंगळवारी दोनशे बैलगाडे या यात्रेत सहभागी झाले. त्या वेळी शर्यतीवर बंदी येईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. शेतकर्यांनी बुधवारी होणार्या शर्यतीसाठी जय्यत तयारी केली व मात्र वाहनातून ते शर्यतीसाठी कारेगावला आले. सकाळी ११ वाजता शर्यतीचे उद्घाटन सुरू असताना वृत्तवाहिन्यांवर शर्यतीवरील बंदीचे वृत्त आले. घाटात ही बातमी समजणार कशी. त्या वेळी आढळराव पाटील बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी हा निर्णय ध्वनिक्षेप हातात घेऊन सांगितला. तेव्हा उपस्थित बैलगाडा मालकांना अक्षरश: झटका बसला. या अनपेक्षित बातमीने त्यांना काहीच सूचेनासे झाले. एरंडे यांनी या वेळी बैलगाडा मालकांना धीर देत यातून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली. ही शेवटची शर्यत ठरणार असल्याने बैलगाडा मालकांनी धावणारे बैलगाडे अक्षरश: नजरेत साठवून ठेवले. सर्वच बैलगाड्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. मात्र, निसर्गाला ही शर्यत मान्य नसल्यासारखे वातावरण होऊन पाऊस झाला. पन्नास बैलगाडे घाटातून धावल्यानंतर पावसाने शर्यत बंद करावी लागली. ही आपली शेवटची बैलगाडा शर्यत असावी, अशी चर्चा बैलगाडा मालक गटागटाने करीत होते. ४चाकण : गाडामालक व बैलगाडा शौकिनांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा चाकण येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला होता. बौद्ध पौर्णिमेला भैरवनाथमहाराजांची होणारी यात्रा नवीन घाटाच्या रूपाने चांगलीच गाजाणार असल्याचे संकेत मिळू लागले होते पण आता हा घाट शर्यत बंदीमुळे सूनासूनाच राहणार आहे. ४ग्रामीण भागातील गाडामालकांसह गाडा शौकिनांना गाड्यांच्या रूपाने घाटाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी गोरे-पाटील परिवाराने पुढाकार घेऊन तब्बल तीन लाख रुपये खर्च करून आकर्षक असा नवीन घाट तयार करून घेतला. येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी सखाराम गोरे, ज्ञानेश्वर गोरे, शंकर गोरे व सुदाम गोरे या चार भावंडांनी या नवीन घाटासाठी जागा दिली. चाकण येथील रोहकल रस्त्यावर शेळी-मेंढी बाजार अर्थात खडीमशिनजवळ हा नवीन घाट तयार करण्यात आला. घाटातून पळणारा गाडा इतरत्र वळू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष व पोलीस पाटील वसंतराव गोरे व युवा नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आवर्जून सांगितले. मात्र आता शर्यती होणार नसल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आता घाट सुनासुना
By admin | Published: May 07, 2014 10:28 PM