पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व ती रोखण्यासाठी शहरातील बांधकामांचे गुगल इमेज काढले जाणार आहेत. यामध्ये १ जानेवारी २०१६ रोजी महापालिका हद्दीतील अस्तित्वात असलेल्या बांधकामांच्या गुगल इमेज उपलब्ध करून घेऊन त्या सुरक्षितरीत्या जतन केल्या जाणार आहेत. या इमेज काढण्यासाठी चार लाखांचा खर्च आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण व आळा घालण्यासाठी आयुक्तांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांची ४ एप्रिल २०१६ला बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर २०१५पर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांबाबत धोरण तयार केले आहे. तथापि त्याबाबत रीतसर आदेश प्राप्त झालेले नाहीत. शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अद्यापही गाजत आहे. महापालिका काही ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. यापुढे अशी बांधकामे होऊ नयेत यासाठी गुगल इमेज तयार करण्यात येणार आहेत. >दरम्यान, नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे महापालिकेला बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्राच्या अंदाजे ९५ टक्के क्षेत्राची इमेज १७ जानेवारी २०१६ व ५ टक्के क्षेत्राची इमेज २८ जानेवारी २०१६ रोजीची उपलब्ध असल्याचे कळविलेले आहे. त्यानुसार शहर अभियंत्यांनी या दिनांकाच्या गुगल इमेज खरेदी करण्याची शिफारस केलेली आहे.
आता बेकायदा बांधकामांवर गुगल इमेजची नजर
By admin | Published: June 13, 2016 1:06 AM