मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. कृती समितीला बाजूला ठेवत समितीबाहेरील संघटनेला हाताशी घेऊन संप मागे घेण्याचा डाव सरकारने खेळला आहे. मात्र सरकारच्या या गनिमीकाव्याला ५० हजार अंगणवाडी ‘ताई’ आझाद मैदानात उतरून उत्तर देतील, असा इशाराच कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.कृती समितीचे निमंत्रक एम.ए. पाटील म्हणाले की, गेल्या ११ दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली संप सुरू ठेवला आहे. सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत संप मागे घेतल्याशिवाय चर्चा न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र कृती समिती संपावर ठाम राहिल्याने त्यात फूट पाडण्यासाठी सरकारने नोकरीवरून काढण्याची नोटीस अंगणवाडी कर्मचाºयांना पाठवली. त्यालाही कर्मचाºयांनी भीक घातली नाही, तर आशा वर्करला पोषण आहार वाटपाचे आदेश सरकारने दिले. मात्र आशा वर्करने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अंगणवाडी तार्इंच्या पाठीशी उभ्या राहण्याची घोषणा केली. त्यामुळे आता कृती समितीबाहेरील एका छोट्याशा संघटनेला चर्चेला बोलावून तुटपुंजी वाढ सरकारने घोषित केली आहे. २७ सप्टेंबरला ५० हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धडक देऊन सरकारला उत्तर देतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.सरकारला चर्चाच करायची होती, तर कृती समितीसोबत चर्चेची दारे का बंद केली, असा सवाल कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी उपस्थित केला. शमीम म्हणाल्या की, किमान साडेदहा हजार रुपये मानधनवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.>अंगणवाड्या उघडून दाखवाच!फुटकळ संघटनेला हाताशी घेऊन महिला व बाल विकासमंत्री आता अंगणवाडी कर्मचाºयांची दिशाभूल करत आहे. संप मागे घेतल्याची घोषणाही सरकारच करत असून एक तरी अंगणवाडी उघडून दाखवाच, असा इशारा कृती समितीने दिला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.
आता सरकारला ‘ताई’च उत्तर देणार!, ५० हजार कर्मचारी एकवटणार, आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 2:30 AM