नागेश घोपेवाशिम: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने आता लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी छुप्या कॅमेर्यांचा वापर करण्याची योजना आखली आहे. ज्याला लाच मागितली आहे त्याच्या सोबत कुणी आल्यास, लाचखोर रक्कम घेण्याचे टाळतात, असे अनेक प्रकरणांमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाचखोरांना पकडण्यासाठी उच्च कार्यक्षमतेच्या छुप्या कॅमेर्यांचा वापर करून, त्यांना रंगेहाथ पकडण्याची मोहीम, एसीबी लवकरच राज्यभरात अंमलात आणत आहे. सदर छुपे कॅमेरे लाच स्वीकारल्या जात असल्याचे चित्रिकरणच करणार आहेत. लाचखोरांच्या विरोधात न्यायालयात खटला चालविताना, सदर चित्रिकरण सज्जड पुरावा म्हणून वापरता येणार आहे. एसीबीने यापूर्वी मुंबईत छुप्या कॅमेर्यांचा वापर केला होता. मुंबईत लाभलेल्या यशानंतर आता हा प्रयोग राज्यभरात राबविला जाणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत, राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक जागरूकता मोहीम राबविली जाणार आहे. त्यानंतर प्रथम मोठ्या शहरांमध्ये, छुपे कॅमेरे काही विशिष्ट कारवाईच्या वेळी वापरले जाणार आहेत. सध्या एखाद्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकार्याने लाच मागितल्यास, त्याच्यासोबतच्या संभाषणाचे ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) केले जाते. त्यासाठी छोटा रेकॉर्डर वापरला जातो. कायद्यातील तरतुदीनुसार ही सारी प्रक्रिया पंचांसमक्ष व्हावी लागते. लाचखोरांना हे माहीत असल्यामुळे, ज्याला लाच मागितली आहे, त्याच्या सोबत इतर कुणी आल्यास, अनेक चतुर लाचखोर लाच स्वीकारत नाहीत. लाच देताना कुणीही साक्षीदार उपस्थित असणार नाही, याची ते खबरदारी घेतात. त्यामुळे अनेकदा कारवाईत तांत्रिक उणिवा राहतात आणि कारवाई झालले अधिकारी, कर्मचारी ते स्वच्छ असल्याचा दावा करतात. यावर उपाय म्हणून चित्रिकरणाचा पर्याय समोर आला आहे. लाच घेतानाचे नेमके चित्रिकरण व्हावे म्हणून अगदी शर्टाच्या बटणाएवढ्या छोट्या आकाराच्या कॅमेर्याचाही वापर होणार आहे. गेल्या वर्षभरापासून लाचखोरांच्या विरोधात एसीबीची मोहीम जोरात सुरू आहे. गत दहा महिन्यांत राज्यात तब्बल एक हजार जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. छुप्या कॅमेर्यांचा वापर सुरू झाल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात लाचखोर जाळ्यात अडकतील, अशी अपेक्षा आहे.
आता छुपे कॅमेरे टिपणार लाचखोरांचे कृत्य!
By admin | Published: October 24, 2014 11:30 PM