नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्यासुजय विखे पाटील यांना धक्कादायकरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी सुजय विखे यांना पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवानंतर सुजय विखे पाटील हे सध्या रिकामेच आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता मी मोकळाच आहे. त्यामुळे एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, जागरण-गोंधळ असेल, तर त्याठिकाणी हजर राहायचं, असं मी ठरवलं आहे. तसे कुठे दहावाच्या कार्यक्रम असेल तरी लगेच सांगा, कावळ्याच्या आधी मी हजर राहीन, असं विधान सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. तसेच आता राजकीय वर्तुळामध्ये सुजय विखे यांनी केलेल्या या विधनाची चर्चा होत आहे.
यावेळी सुजय विखे यांनी राजकारणावरही मोजकं भाष्यं केलं. बदललेलं राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो. पण लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामधून मी बरंच काही शिकलो आहे, असं विधान त्यांनी केलं. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही सुजय विखे पाटील यांनी भेटीगाठींचा धडाका कायम ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांची काय रणनीती असेल याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.