लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस पत्नी दीपाली गणोरे यांच्या हत्याकांडाने सर्वांनाच सुन्न करून सोडले असताना, आईच्या हत्येमुळे आपली सुटका झाल्याचा जबाब सिद्धांतने पोलिसांना दिला आहे. हत्येनंतर आईच्या मृतदेहाशेजारी लिहिलेल्या वाक्यानंतर आलेली स्माईलीही सुटकेची असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली यांच्या हत्येप्रकरणी सिद्धांतला जोधपूरमधून वाकोला पोलिसांनी अटक केली. सध्या तो २ जूनपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. या वेळी त्याची मानसिक स्थितीही तपासण्यात येणार आहे. पोलिसांनी सिद्धांतचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही सिद्धांतला आईच्या हत्येबाबत पश्चात्ताप नसल्याचे चौकशीतून समोर येत आहे. सिद्धांतच्या माहितीनुसार, दीपाली या पतीवर संशय घेई. कामावरून घरी आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करत असे. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होत असे, मात्र बाबा नेहमीच शांत बसत. त्यात दिवसभर कॉलेजमध्ये काय केले? कुणासोबत काय बोलणे झाले. याचा आढावाही त्यांना रोज देणे भाग पडे. त्यात ती मोबाइल, लॅपटॉपही तपासत असे. अभ्यासावरून उठता-बसता टोमणे सुरू होते. तिच्याकडून आपले मानसिक शोषण सुरू असल्याचे सिद्धांतचे म्हणणे आहे. हत्येच्या दिवशीही रिपोर्टकार्डवरून आईची बडबड सुरू झाली. या वेळी स्वयंपाकघरातील चाकूने मी स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे तिने पाहिले आणि पुन्हा ओरडण्यास सुरुवात केली. यातूनच त्याच चाकूने तिची हत्या केल्याचे सिद्धांतचे म्हणणे आहे.सिद्धांतने आईच्या मृतदेहाशेजारी तिच्याच रक्ताने ‘टायर्ड आॅफ हर, कॅच मी अँड हँग मी’(तिला कंटाळलो होतो. मला पकडा आणि फासावर लटकवा) असे लिहून पुढे स्माईली काढण्यात आला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आईच्या हत्येनंतर त्याची सुटका झाल्याची भावना त्याच्या मनात आली. त्यातूनच लिहिलेल्या मजकुराशेजारी स्माईली काढण्यात आल्याचे सिद्धांतने पोलिसांना सांगितले आहे. आईच्या हत्येनंतर आपल्यावर कोणीच जाच करणार नाही, कोणीच त्रास देणार नाही. त्यामुळे आता मी सुटलो... असे सिद्धांतने पोलिसांना सांगितले आहे. शिवाय माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते, असा उलट सवालही त्याने पोलिसांना या वेळी विचारल्याचे समजते.
आता मी सुटलो...
By admin | Published: May 29, 2017 3:33 AM