तेजसही राजकारणात?
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांच्या गर्दीला सामोरे गेले. तेथील भाषणानंतर ते आत गेले. तरीही गर्दी तेथेच होती. तेव्हा त्या गर्दीत मिसळले, ते तेजस ठाकरे. आजवर राजकारणापासून अलिप्त असणारे, पर्यावरणात रमणारे! त्यांनी युवा सेनेची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी मागणी आधीपासूनच होत होती. आता ती वेळ आलेली दिसते.
आमदारांची रिक्षा सफर
मनसे वर्धापन दिनाच्या अनुषंगाने पुणे येथे आयाेजित रिक्षा साैंदर्य स्पर्धेला आमदार राजू पाटील यांनी उपस्थित राहून रिक्षात बसण्याची मजा लुटली. कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षाचालक म्हटले की, मुजाेर अशी प्रतिमाच डाेळ्यासमाेर उभी राहते. पाटील सांगतात की, अनेक रिक्षाचालक हे आपल्या रिक्षाची पोटच्या मुलाप्रमाणे देखभाल करतात. प्रवाशांचीही काळजी घेतात, असा अनुभवही त्यांनी आवर्जून नमूद केला. चार रिक्षांत बसण्याचा त्यांनी आनंद लुटला. यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींनाही उजाळा दिला. पाटील यांचे रिक्षात बसलेले फाेटाे पाहून कल्याण-डाेंबिवलीतील रिक्षाचालक असे कधी वागणार, असे प्रश्न प्रवाशांना पडल्याशिवाय राहणार नाही.
पुन्हा वेध मंत्रिपदाचे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे राज्यात मंत्री होऊ इच्छिणाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शाह, शिंदे, फडणवीस यांच्या भेटीत मंत्र्यांची नावे निश्चित होतील आणि आपल्याला एकदाची संधी मिळेल म्हणून अनेकांनी पुन्हा एकदा देव पाण्यात घातले, असे म्हणतात. पण अशा भेटीचे संकेत मिळत नसल्याने ती व्हावी, म्हणूनही काहींनी पडद्यामागून सूत्रे हलवण्याचा प्रयत्न केला म्हणे.
काँग्रेसच्या महिला कुठे आहेत?
सध्या ठाण्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. त्यात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. महेश आहेर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या महिला आघाडीने महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने पाठिंबा दिला. त्यानुसार मुख्यालयासमोर आंदोलन सुरू झाले खरे; मात्र या आंदोलनात काँग्रेसच्या महिलांपेक्षा राष्ट्रवादीच्याच महिला अधिक संख्येने हाेत्या. आंदोलन संपत आले तरी काँग्रेसच्या एक- दोन महिला पदाधिकारी हजर असल्याचे दिसते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने ‘अरे, आपल्या पक्षाच्या महिला कुठे आहेत?’, असा सवाल पदाधिकाऱ्याला केला. त्यावर ‘त्या येत आहेत,’ असे त्याने सांगितले. त्या येईपर्यंत आंदोलन संपले हाेते. आंदोलन संपत आल्यावर महिलांसाठी मागविलेल्या खुर्च्यांचा टेम्पोही दाखल झाला. मात्र, खुर्च्या काही खाली आल्या नाहीत. त्यामुळे यावरून चांगलीच खमंग चर्चा रंगली होती.