मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गेल्या दोन दिवसांत राज्यातील निवडणूक यंत्रणेची पाहणी करण्यात आली. याबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत प्रत्येक ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिनची सोय उपलब्ध करून दिल्याने, मतदारांना त्यांनी केलेल्या मतदानाची खातरजमा करून घेता येईल, असे लवासा यांनी सांगितले.
लवासा म्हणाले की, आयोगाने निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांपासून निवडणुकांशी संबंधित बँक, उत्पादन शुल्क, पोस्ट अशा विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक बैठकीत निवडणुकीच्या ठिकाणी मतदारांना पाणी, वीज, शौचालय अशा पायाभूत सुविधा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची चोख तयारीही झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय मतदारांमध्ये प्रथमच वापरात येणाºया व्हीव्हीपॅट मशिनबाबत जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यंदा निवडणुकांमध्ये प्रत्येक ईव्हीएममागे एक व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, भारताने पाकव्याप्त काश्मीरवर केलेल्या हल्ल्यानंतर निवडणुकांच्या तारखांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही लवासा यांनी स्पष्ट केले. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी २३ व २४ फेब्रुवारीला विशेष शिबिर घेतले असून, २ व ३ मार्चला आणखी शिबिरांचे आयोजन केले आहे. यंदा एकही मतदार मत देण्यापासून वंचित राहू नये, असा निर्धार आयोगाने केल्याची माहिती त्यांनी दिली.गुन्ह्यांची मिळणार माहितीयंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना तीन वृत्तपत्र, दोन वृत्तवाहिन्यांवर त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती जाहिरात स्वरूपात द्यावी लागेल. शिवाय उमेदवारी मिळालेल्या राजकीय पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करावी लागेल.