शिंदे गट शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावरून ठाकरे गटाकडून उमेदवार अमोल कीर्तीकर यांचे वडील आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांचे सूचक वक्तव्य आले आहे.
राहुल शेवाळे लोकसभेचे गटनेते होते, ज्यांना प्रशासकीय कामांचा देखील चांगला अनुभव आहे. शेवाळे एक सक्षम नेते आहेत, ते जरुर जिंकणार, असा विश्वास गजानन कीर्तीवर यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे, आता कळेलच की जनता कोणासोबत आहे. निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा तुल्यबळच असतो. असली कोण आणि नकली कोण हे या निवडणुकीत कळेलच, असा दावाही त्यांनी केला आहे.
एकीकडे ठाकरे गटाकडून कीर्तीकरांचे पूत्र निवडणूक लढवत आहेत. अमोल कीर्तीकर हे मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तीकरांचे असे वक्तव्य आले आहे. आता एकीकडे मुलगा जिंकला तर ठाकरे गट असली की शेवाळे जिंकले की शिंदे गट असली, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडणार आहे.