मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपची आणखीच पिछेहाट होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. आता येथील जिल्हा परिषदही महाराष्ट्रात नुकत्याच उदयास आलेल्या महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतली आहे.
मागील अडीच वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेवर होते. मात्र या सत्तेला आता महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. जिल्हा परिषदेच्या निकालामुळे जिल्ह्यातून भाजप जवळजवळ हद्दपार झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघही भाजपकडे नसून शहरातील महानगर पालिका देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. या आघाडीने आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्ता काबिज करण्याचे ठरवले असून भाजपला दूर ठेवण्याचा चंगच बांधला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक आहे. पाटील सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्याच जिल्ह्यात महाविकास आघाडीने करामत केली आहे.