लोकमत ऑनलाइन
नवी दिल्ली, दि. 31- सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाइन करण्याकडे सगळ्यांचा भर असतो. पॅन कार्डपासून ते पासपोर्टपर्यंत सगळेच अर्ज ऑनलाइन भरले जातात. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक गोष्टी डिजीटल करण्याकडे भर दिला जातो आहे. आता सरकारकडून आणखी एक सोपा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आता फक्त एका मेसेजवर नागरिकांना आपले आधार कार्ड आणि पॅनकार्ड जोडून घेता येणार आहे. आयकर विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया जास्त सोपी होण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांकांची जोडणी उपयुक्त होणार आहे. पॅनकार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करायला दोन्ही कार्डांवरील नावं सारखी असणं आवश्यक आहे. दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरीकांनी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. याशिवाय नागरीकांना ऑनलाईनही आपल्या कागदपत्रांची जोडणी करुन घेता येणार आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरील लिंकवरुनही हे काम करता येणार आहे.
युनिक आयडेंटीफीकेशन ऑफ इंडियाकडून पॅन आणि आधार कार्ड लिंक झाल्याचं व्हेरीफीकेशन होईल. त्य़ानंतर ही जोडणी निश्चित होणार असल्याचं संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. आयकर विभागाकडून देण्यात येणारी ही सुविधा नागरीक आणि आयकर भरणाऱ्यांसाठी असणार आहे.
सरकारच्या २०१७ मधील अर्थविषयक कायद्यानुसार कर भरणाऱ्याला आधार कार्ड सादर करणं बंधनकारक आहे. तसंच जुलै २०१७ पासून पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. सुरक्षेच्यादृष्टीने आणि अर्थिक व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं महत्त्वाची ठरणार आहे.