ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. २८- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लेनची शिस्त मोडणे, अतिवेगाने वाहने चालविणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची २४ तास नजर राहणार आहे. द्रुतगती मार्गावर शिस्त लावण्यास ४ ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे प्रात्यक्षिक शनिवारी घेण्यात आले. या वेळी लेनची शिस्त मोडणाऱ्या काही अवजड वाहनांविरोधात कारवाई केली.
द्रुतगती महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात लेन कटिंग करणाऱ्या, अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचे पहिले प्रात्यक्षिक व सर्वेक्षण महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महामार्ग पोलीस निरीक्षक अजय बारटक्के, सुधीर अस्पत, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी, एम. आर. काटकर यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. (प्रतिनिधी)एका ड्रोनची चार किलोमीटर नजरनियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र, व्हिडीओ क्लिप व त्या वाहनांचा नंबर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे टिपली जाऊन ती माहिती महामार्ग पोलिसांना देतील. त्या वाहनांच्या छायाचित्राची प्रत संबंधित वाहन चालकाला देऊन कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या ठिकाणांमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालापूर टोलनाका, तर उलट जाणाऱ्या वाहनांसाठी उर्से टोलनाक्याचा समावेश आहे. बेशिस्त वाहनांवर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे असणार आहे. यामध्ये खंडाळा घाट परिसर, खोपोली एक्झिट ते फूड मॉल, कामशेत बोगदा ते उर्से टोलनाका, खालापूर टोलनाका ते पनवेल परिसर यांचा समावेश आहे. एक कॅमेरा चार किलोमीटर हालचालींवर नजर ठेवणार आहे.