मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या शेवटच्या यादीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यानंतर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची राहणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याआधी अकरावी प्रवेशाच्या तब्बल १० प्रवेश याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे महाविद्यालय सुरू झाले असून परीक्षा तोंडावर आहेत. दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने दहावी प्रवेश यादी जाहीर केली. या वेळी एकूण ६ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ५६४ विद्यार्थ्यांना प्रवेश घोषित झाले, तर ३२ विद्यार्थ्यांना एकाही महाविद्यालयात प्रवेश देता आला नाही. प्रवेश घोषित झालेल्या ६ हजार ५६४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ४९१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. त्यामुळे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधील २०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही.परिणामी आतापर्यंत कुठेही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून २६ सप्टेंबरपासून अकरावी प्रवेश यादीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. २६ व २७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करून महाविद्यालय पसंतीक्रम अर्ज भरायचे आहे. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, तर २९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘आता चुकाल, तर वर्षाला मुकाल!’
By admin | Published: September 24, 2016 1:46 AM