राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. एकीकडे शरद पवार यांची मनधरणी करून त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते आग्रही भूमिका घेत आहेत. दरम्यान, या निर्णयावरून काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे.
आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसमध्ये सर्वस्वी निर्णय हे राहुल गांधीच घेतात. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी खर्गे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हा निवडणुकीत आम्ही शशी थरूर यांच्यासोबत होतो. मात्र निवडून सहा महिने झाले तरी अजूनपर्यंत मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या एआयसीसीमधील महासचिव, इतर पदाधिकारी असतील. तसेच सीडब्ल्यूसी होऊन दोन महिने होत आहे आहे. मात्र सीडब्ल्यूसीची निवड राहुल गांधी करू देत नाही आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून शरद पवार यांनी एक प्रशंसनीय आणि दुसऱ्या लोकांना प्रेरित करणारा निर्णय घेतला आहे, असे देशमुख म्हणाले.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत ते म्हणाले की, ही परिस्थिती काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. तर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. त्या कालावधीमध्ये देखील त्या कालावधीत देशील एकही दिवस एआयसीसीच्या कार्यालयात न येता राहुल गांधी हे देशभरातील काँग्रेसचे निर्णय घेत होते. ही बाब काँग्रेसमधील कुणीही जबाबदार व्यक्ती सांगेल, असे देशमुख म्हणाले.
हे सर्व व्हावं आणि या वयामध्ये शरद पवार यांनी जे कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. त्याच पद्धतीने मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सातत्याने होत असलेल्या अपमानाच्या पार्श्वभूमीवर पदमुक्त व्हावं. तसेच तरुण व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली पाहिजे. शशी थरूर यांच्यामागे देशातील तरुण उभे राहिले होते. त्यांना जर संधी मिळाली असती तर काँग्रेसला चांगले दिवस आले असते. आता शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेसमध्ये वयोवृद्ध झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्यांना सातत्याने काम करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून आदेश घ्यावे लागतात. त्यांनी पायउतार झाल्यास त्यांची निवृत्ती ही ग्रेसफूल ठरेल. शशी थरूर यांच्याकडे पद मिळाल्यास ते या पदाला अधिक चांगला न्याय देऊ शकले असते, असेही आशिष देशमुख म्हणाले.