लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गवतापासून मद्यनिर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यासाठी येथील खासगी कंपनी आणि आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन सुरू झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच पुण्यामध्ये या संशोधकांसमवेत बैठक घेऊन चर्चाही केली होती. त्यादृष्टीकोनातून या पथदर्शी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. गवताची शेती केली जात नाही. ते‘अॅग्री वेस्ट’ म्हणून गणले जाते. गवतापासून बायोमास तयार होते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यातील बायोमास-सेल्यूलस नष्ट करुन त्याचे द्रवरुपात रुपांतरण कसे करता येईल, यावर खासगी कंपनीबरोबरच आगरकर इन्स्टिट्यूटमध्येही संशोधन सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मक्याचे कणीस दाणे काढल्यानंतर काहीच उपयोगाचे होत नाही. त्यापासूनही अल्कोहोल तयार करण्याच्यादृष्टीनेचही संशोधन सुरू आहे. कंपनीच्या संशोधक आणि पदाधिकाऱ्यांची मंत्री बावनकुळे यांनी अलिकडेच भेट घेऊन व्यावसायिक अल्कोहोल परवाना देण्यासंदर्भात चर्चा केली. सीएसआर अंतर्गत या प्रकल्पाला शासन मान्यता देऊन सवलतही दिली जाण्याची शक्यता आहे. बीअर बनवण्यासाठी बार्ली १३० रुपये किलो दराने आयात केली जाते. पंजाब आणि हरयाणामधील उत्पादकांकडून आयात केल्यास ७० रुपये किलो असा दर पडतो. महाराष्ट्रामध्ये बार्लीचे उत्पादन घेण्यासंदर्भातही चर्चा सुरु असून एका स्वयंसेवी संस्थेने अकोल्यामध्ये हा प्रयोग सुरू केला आहे.आदिवासी आणि दुष्काळी भागामध्ये बार्ली पिक घेऊन त्यांना अधिक फायदा मिळू शकेल, असा विश्वास या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला आहे. गवतापासून मद्यनिर्मिती करण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी पुण्यातील बैठकीमध्ये संशोधकांना सविस्तर सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना फायदा मिळेल. हा पथदर्शी प्रकल्प असेल.- मोहन वर्दे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
...आता गवतापासून मद्यनिर्मिती?
By admin | Published: May 06, 2017 3:40 AM