मुंबई : कोकणवासीयांची लोकप्रिय असलेली २२ डब्यांची कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस १ सप्टेंबरपासून २४ डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होणार आहे.वाढत्या गर्दीमुळे मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून २२ डब्यांसह चालविण्यात येणाऱ्या मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस २४ डब्यांची करण्याची मागणी कोकणात जाणाºया प्रवाशांनी केली होती. या मागणीची दखल घेत, कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेमधील गर्दी कमी करण्यासाठी २४ डब्यांची केली जाणार आहे. यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली. कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांची वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन कोकण रेल्वे अधिकाºयांकडून दिले आहे, असे कोकण रेल्वे जागृत संघाचे सचिव विलास पावसकर यांनी सांगितले. त्यानुसार, १ सप्टेंबरपासून २४ डब्यांसह मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस धावेल.यासह वांद्रे, बोरीवली, पनवेल मार्गे मडगाव कायमस्वरूपी गाडी सुरू करण्यात यावी, यासाठी येत्या काही दिवसांत रेल्वे मंत्री पीयूष गोयल व मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या अधिकाºयांशी बैठक घेतली जाणार असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गाहून कायमस्वरूपी कोकणात जाणारी मेल, एक्स्प्रेस असल्यास प्रवाशांची तारांबळ कमी होईल, अशी अपेक्षा आहे. सोबतच नायगाव ते जूचंद्र ७ किमीचा चार पदरी रेल्वे मार्ग लवकर मार्गी लावावा, अशी मागणीही संघाने केली आहे.
आता मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस २४ डब्यांची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:24 AM