Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. तसेच या विधानसभेत आमदार पाडणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जात आहे. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील ५ सप्टेंबरपासून विधानसभा निहाय बैठका घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषयही महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे. यासाठी आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो
शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत. शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवत आहे. सरकार कर्जमाफी कशी करत नाही, ते पाहतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलनासोबत शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे पाटील कसे आंदोलन उभारणार, सरकार दरबारी त्याची कशी दखल घेतली जाणार, हे आंदोलन कसे असणार, याबाबत निश्चितता नसली तरी मनोज जरांगेच्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील ८०० इच्छुक उमेदवारांनी भेट घेतली
महाराष्ट्रातील ७०० ते ८०० इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवार पाहिले की वाटते कुठून या लफड्यात पडलो. भरपूर उमेदवार आहेत. आम्हाला वाटत होते की, मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. त्यानंतर नंबर २ ला मराठवाड्यातून अर्ज आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
दरम्यान, निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचे तसेच सुरु झाले आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकतीने लावून धरणार आहोत. त्यासाठी, ५ सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघ निहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली.