ऑनलाइन लोकमत/चेतन ननावरे
मुंबई, दि. 18 - गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभर मूकपणे लाखोंच्या संख्येने मोर्चा काढणा-या मराठा क्रांती मोर्चाने अखेर मौन सोडले आहे. १४ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर निघणा-या महामोर्चात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर राज्यभर चक्काजाम करू, असा इशारा अमरावती येथे झालेल्या जिल्हा समन्वयकांच्या बैठकीत झाला आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर अधिवेशनावर काढण्यात येणा-या महामोर्चाची राज्यस्तरीय नियोजन बैठक अमरावती येथे शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आली. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्हा समन्वयकांनी उपस्थिती लावली होती. त्यात घेतलेल्या निर्णयानुसार, नागपूरमध्ये निघणाºया मोर्चात येथील कुणबी मराठा म्हणून परिचित असलेला मराठा समाजही सामील होणार आहे. त्यामुळे या मोर्चाला सकल मराठा क्रांती मोर्चा म्हणण्यात येईल. अधिवेशनात मागण्या मान्य झाल्या नाही, तर राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाईल.
दरम्यान, नागपूर मोर्चामध्ये मागण्या मान्य झाल्या नाही, तर त्याच दिवशी राज्यव्यापी मुंबई मोर्चाची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुंबईच्या मोर्चात राज्यभर विखुरलेला मराठा समाज कोट्यवधींच्या संख्येने जमा केला जाईल. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यस्तरीय ‘पाठपुरावा समिती’ स्थापन केली जाणार असून या समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील ५ आयोजकांचा समावेश केला जाईल. त्यामुळे चक्का जाम आंदोलनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असले, असेही आयोजकांनी सांगितले.
राज्यस्तरीय बैठकीत झालेले निर्णय -
- अधिवेशन काळात काढल्या जाणाºया नागपूर मोर्चामध्ये मागण्या मान्य झाल्या नाही, तर सकल मराठा क्रांती र्चाच्या वतीने महाराष्ट्रात राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाईल.
- नागपूर मोर्चामध्ये राज्यव्यापी मुंबई मोर्चाची तारीख जाहीर केली जाईल.
- मुंबईच्या मोर्चामध्ये कोट्यवधींच्या संखेने मराठा समाज मुंबईमध्ये एकवटण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा आयोजकावर असेल.
- ‘सकल मराठा समाज, महाराष्ट्र’ आयोजित ‘मराठा कुणबी (मूक) मोर्चा, नागपूर’ या नावाने नागपूरचा मोर्चा निघेल.
- या मोर्चात ‘मराठा कुणबी एकत्र आला, सकल मराठा समाज, महाराष्ट्र आयोजक झाला’ ही कॅच लाईन असेल.
- www.sakalmarathasamaj.com हे सकल मराठा समाजाची अधिकृत संकेतस्थळ असून मराठा समाजाने या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.