विवेक चांदूरकर / अकोला
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केंद्रीय भाषातज्ज्ञ समितीने केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे आता लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा होणार असून, यामुळे मराठीची पताका जगभर पसरून ती शक्तीशाली भाषा होईल, असा विश्वास अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी रविवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. हरी नरके माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेचा किती विकास होईल व आता मराठी माणसांची जबाबदारी कशी वाढली, यावर विचार व्यक्त केले.
प्रश्न : मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर फायदा काय होईल?
जगभर २0 हजार भाषा आहेत. त्यापैकी काही भाषा प्रतिष्ठित असून, त्यांचा जगभरात मान आहे. आता मराठी भाषेलाही जगभर मान-सन्मान मिळणार असून, त्या भाषांच्या बरोबरीने मराठीला गणले जाईल. जगभरातील नागरिकांचा या भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तसेच मराठीची प्रतिष्ठा उंचावेल व जगभर मराठीची पताका उभारली जाईल. सध्या मराठी महाराष्ट्राबाहेर १५ विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाते. हा दर्जा मिळाल्यावर भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मराठी शिकविण्यासाठी अनुदान दिले जाईल.
प्रश्न: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सुरुवात केव्हा झाली व प्रवास कसा झाला?
२00४ साली तमीळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याचवेळी मराठीलाही हा दर्जा मिळावा, अशी इच्छा रंगनाथ पठारे व मराठीप्रेमी साहित्यिकांनी व्यक्त केली. त्यानंतर ४ वर्षांपूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर अनेक पुरावे गोळा करून सप्टेंबर २0१३ मध्ये केंद्र शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला. ५ फेब्रुवारी २0१५ रोजी केंद्रात असलेल्या तज्ज्ञांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केली. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
प्रश्न : कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष असतात?
याकरिता चार निकष असतात. १) ती भाषा दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीची असावी. २) भाषेची स्वत:ची स्वतंत्र परंपरा असावी, ती भाषा उसणी घेतलेली नसावी. तसेच भाषा व वाड्मय स्वयंभू असावे. ३) भाषेचे आत्ताचे रूप आणि प्राचीन रूप यामध्ये अंतर असू शकते, मात्र गाभा एकच असावा. ४) त्या भाषेचे साहित्यातील श्रेष्ठत्व असावे. या चार अटी आहेत.
प्रश्न : अभिजात दर्जामुळे नवी पिढी, तरुणांना काय मिळेल ?
केंद्रात अन्य भाषांसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद असते तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ५00 कोटी रुपये मिळणार आहेत. नव्या पिढीसाठी संशोधन प्रकल्प राबविल्या जाईल. मराठी ही ५२ बोली भाषा मिळून बनलेली आहे. या भाषांमधील लोकसाहित्य, म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन व संवर्धन करण्यासाठी अनुदान दिले जाईल. तरुण या भाषेचा विस्तृत अभ्यास करू शकतील.
प्रश्न: अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठी माणसाची जबाबदारी काय आहे?
मराठी माणसांची जबाबदारी वाढली आहे. मराठीबाबत दोन गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मराठी ही ८00 वषार्ंपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे आता मराठी ८00 नव्हे तर अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे, असे ठासून सांगायला हवे. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आलेली भाषा असल्याची चुकीची माहिती दिल्या जाते, तर मराठी ही संस्कृत भाषेच्या पूर्वीही होती व ती संस्कृतची मुलगी नसून मावशी आहे. संत नामदेव म्हणतात- संस्कृतवाणी देवे केली, मग पाकृत काय चोरापासून झाली.