- हवालदारासह तीन पोलीस शिपाई असणार : डॉक्टरांवरील हल्ले होणार कमी!नागपूर : डॉक्टर व रुग्णांचे संबंध बिघडत चालले आहेत. यातून डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहे. यावर्षी राज्यभरातील मेडिकल रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांवर ३१ हल्ले झाले आहेत. याला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने डॉक्टरांना सुरक्षा पोहोचविण्याची मागणी केली होती. याची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्व पोलीस आयुक्तांना राज्यभरातील सर्व मेडिकल कॉलेजना सुरक्षा पुरविण्याबाबतचे निर्देश दिले आहे. औरंगाबाद येथे ११ महिन्यांत मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांवर सहा हल्ले झाले आहेत. नुकतेच केईएममध्ये दोन तर नांदेड येथे तीन हल्ले झाले आहेत. हल्ल्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात कायद्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. या कायद्यात हल्लेखोरांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, तीन वर्षांची सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यास दुप्पट वसुली करणे अशी तरतूद आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. याचसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना पोलीस सुरक्षा पुरविण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून सर्व पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले. यात एक पोलीस हवालदार आणि तीन पोलीस शिपाई असे एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ मेडिकल कॉलेजमध्ये नेमणूक करण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी नोंदवही ठेवण्यात येऊन दर दीड ते दोन तासांनी सदर ठिकाणी पेट्रोलिंग बीट मार्शल यांना भेट देण्याबाबतही कळविण्यात आले आहे.