ढालगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणेच देश चालविला जात आहे. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहोत, मात्र केंद्रात मोदींनी मंत्रिपद देतो म्हणून दोनवेळा सांगितले आहे. आता तिसऱ्यावेळी केंद्रात मंत्रिपद न दिल्यास आम्ही भाजपसोबत असणार नाही, असा इशारा खासदार व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी दिला.ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे डॉ. आंबेडकर ढालेवाडी मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व करुणा बुद्धविहाराच्या लोकार्पणप्रसंगी आठवले बोलत होते. ते म्हणाले की, दीड वर्षाच्या कालखंडात भाजप सरकारने साडेचारशे कोटी रुपये आंबेडकरांसाठी मंजूर केले. तसेच इंदू मिलच्या जागेचा प्रश्न मार्गी लावला. याआधीच्या कॉँग्रेस सरकारला मी व शरद पवार यांनी भेटून सांगितले होते; परंतु त्यांनी भविष्यात आपलेच सरकार येणार आहे, तेव्हा तो प्रश्न मार्गी लावू म्हणून दुर्लक्ष केले, पण कॉँग्रेसवाल्यांना हे माहिती नव्हते की मोदी सरकार येणार आहे. खा. संजयकाका पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या विदेशातील घराचा लिलाव नको, ते आपल्याच देशातील सरकारने खरेदी करावे, यासाठी आठवले व मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती केली होती. आठवले यांनी समाजासाठी राज्यातील सत्तेत मिळणारे मंत्रिपदही नाकारले होते. त्यांना मंत्री करण्यासाठी माझा नक्कीच खारीचा वाटा असेल.शिवसेनेचे जयसिंग शेंडगे, दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल युनायटेड फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष अविनाश कांबळे, आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे, जगन्नाथ ठोकळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सभापती वैशाली पाटील, माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, निकाळजे, नाना वाघमारे, जितेंद्र आठवले, काकासाहेब आठवले, दिलीप आठवले, सुरेश आठवले, विक्रम आठवले, पोपट आठवले उपस्थित होते. (वार्ताहर)
आता मंत्रीपद दिले नाही, तर भाजपसोबत जाणार नाही!
By admin | Published: December 29, 2015 11:38 PM