सातारा : ‘राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच साताऱ्यालाही दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस झालेल्या पश्चिमेकडील तालुक्यांमधूनही पिण्याचे टँकर, चारा छावणी, तसेच नळपाणी योजना, विंधन विहिरींची मागणी आहे. मात्र, कागदी घोडे नाचवत प्रस्ताव दडपून ठेवले जात आहेत. वास्तविक, दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच अधिक सजगपणे काम करायला हवे होते, पण तसे घडताना दिसत नसल्याने लोकप्रतिनिधींसह सरकारमधील मंत्र्यांनाही आता आंदोलनात उतरावे लागेल,’ असा संतापजनक इशारा सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.शिवतारे यांनी शनिवारी नियोजन भवनात सातारा जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे उपस्थित होते. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील आमदार पोटतिडकीने दुष्काळी उपाययोजनांची मागणी करत असताना, जिल्ह्यातील अधिकारी मात्र दुष्काळ नाही, हेच दाखविण्याचा आटापिटा करताना पाहायला मिळत होते. आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, आ. शंभुराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. आनंदराव पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या आणि आग्रही मते मांडली. गेल्या दीड महिन्यापासून चारा छावण्या मागण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत, यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. चाऱ्याबाबतचे प्रशासनाकडील आकडे फसवे आहेत. प्रत्यक्ष सर्व्हे करून गरज असलेल्या तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा, अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी केली. आ. शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांनी गोरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावरही आमदारांनी जोरदार ताशेरे ओढले. नळपाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठवूनही ते कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांच्याकडून अडविले जात आहेत. विंधन विहिरींची मागणी असताना, भूजल विभाग आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, असे सांगून टाळाटाळ करत आहे.दुष्काळाबाबत याविभागातील अधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही, असे आरोप आमदारांनी केले, तसेच पालकमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालून, पुन्हा बैठक बोलाविण्याची मागणी केली. (प्रतिनिधी) मागणीनंतर सात दिवसांत टँकर अन् छावण्या!माण-खटाव तालुक्यांतील तीव्र दुष्काळी परिस्थितीचा विचार करता, या दोन तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. दरम्यान, मागणीनंतर सात दिवसांत टँकर पुरवठा सुरू करा. दुष्काळाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिली. उद्या मुंबईत बैठकपाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सर्व विभागांनी एकत्र बसून कागदपत्रांची पूर्तता करावी. उद्या, सोमवारी मुंबईत सर्व आमदार, जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे.
आता मंत्री आंदोलन करतील !
By admin | Published: April 03, 2016 3:50 AM