लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संपाप व्यक्त होत आहे असून नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरुच ठेवत यापुढे संपाची सूत्र नाशिकमधून हालविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. मुंख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. असा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल उपस्थित करीत सूयर्वंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषण देत सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. तत्पुर्वी मुंबईतून संप मागे घेण्याची घोषणा झाल्याने नाशिकचा सुरू ठेवत पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकरी बाजार समिती परिसरात दाखल झाले.
यावेळी एका व्यापाऱ्याने त्याचे दुकान सुरू करण्याता प्रयत्न केला. त्याला शेतकऱ्यांनी विनंतीकरून दुकान बंद करण्याचे आवाहन केले. मात्र संप मागे घेतला असून मी माल पैसे देऊन खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा माल फेकण्यास सुरुवात केल्याने व्यापारी विरोधात शेतकरी असा संघर्ष निर्माण झाल्याने बाजारसमिती आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी बैठकीला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला हमी भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते हंसराज वडघुले, गिरीधर जाधव, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, आमदार जे.पी. गावित, किसान सभेचे राजू देसले आदिंनी शेतकरी संपाविषयी भूमिका स्पष्ट करताना नाशिक जिल्हासह राज्यभरात संप सुरुच ठेवण्याच्या शेतकऱ्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.