मुंबई - देशाचं राजकारण मागील कित्येक वर्षांपासून भगव्या रंगाच्या आजुबाजूला फिरत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच भगव्या रंगाला महत्त्व प्राप्त आहे. परंतु, भारतावर इंग्रजांचे राज्य असताना देशातील नागरिक तिरंग्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागले. आजही तिरंग्यासमोर सर्वजन नतमस्तक होतात. परंतु, अनेक राजकीय पक्षांमध्ये भगव्या रंगालाच अधिक महत्त्व देण्यात येते. यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारा असणाऱ्या शिवसेना आणि भाजप यांचा समावेश होते. परंतु, यात आता राष्ट्रवादीही सामील होणार आहे.
धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला राष्ट्रवादी पक्ष यापुढे आपल्या कार्यक्रमात दोन झेंडे ठेवणार आहे. पक्षाचा एक आणि दुसरा भगवा झेंडा राष्ट्रवादीच्या सभेत असावा अशी घोषणाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे यापुढे सभेत ठेवण्याच्या सूनचा पवार यांनी केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीलाही भगव्याची भूरळ पडली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का ? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये 'शिवरायांचा भगवा' आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघाले होते. त्यात छत्रपती शिवाजी महाजारांचा फोटो असलेले भगवे झेंड वारण्यात आले होते. ज्या जिल्ह्यात मोर्चे असतील तो जिल्हा मोर्चाच्या दिवशी भगवा होत असे. या भगव्या खाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज जमला होता. तोच पॅटर्न राष्ट्रवादीने राबविण्याचा निश्चय केलेला दिसत आहे.
याआधी शिवसेनेकडून सर्वाधिक प्रमाणात भगव्याचा उदो उदो करण्यात येत होता. मात्र यापुढे राष्ट्रवादीही भगव्या खाली एकत्र येणार आहे. सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे.