सचिन सावंत : खडसेंची कार्यरत न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावीपुणे : डाळ घोटाळ्यांबाबत आम्ही माहिती घेत असून त्यात बरेच काही दिसते आहे. महसूलमंत्री खडसे यांच्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा नंबर आहे, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. खडसे यांच्यावर प्रथम एफआरआय दाखल करावा व कार्यरत न्यायाधीशांमार्फतच त्यांची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमासाठी सावंत पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी घोटाळेबाज मंत्र्यांचे सरकार अशी राज्य सरकारवर टीका केली.
खडसे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करण्याला काँग्रेसचा विरोध आहे. जमीन घोटाळ्यासारखा आरोप होऊनही त्यांच्यावर पोलिस एफआरआय दाखल करीत नाहीत यावरून पोलिसांवर दबाव आहे हे सिद्ध होते. कार्यरत न्यायाधिशांकडून चौकशी झाली तर त्यातून सत्य बाहेर येईल. भ्रष्ट मंत्र्यांविरुद्धची लढाई काँग्रेस विधीमंडळाबरोबरच रस्त्यावर येऊनही लढणार आहे असे सावंत म्हणाले.
मंत्री बापट यांच्याबद्धल बोलताना ते म्हणाले,ह्यह्यकाँग्रेस डाळ घोटाळ्याची माहिती घेत आहे. निवडणुकीत ज्यांनी आर्थिक मदत केली त्यांच्यासाठी डाळीसंबधात विशिष्ट निर्णय घेण्यात आले. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला व त्यांनी आंधळेपणाने त्यावर स्वाक्षरी केली. हा सगळा घोटाळा साडेचार हजार कोटी रूपयांचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. काँग्रेस लवकरच तो कागदोपत्री सिद्ध करणार असून खडसेंनंतर आता बापट यांचाच नंबर आहे.
नारायण राणे यांनी खडसे यांच्याबाबत बोलताना बहुजन समाजातील मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात बोलताना सावंत यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत होते, पक्षाचे नाही असे उत्तर दिले. शहनाज पूनावाला यांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेस समितीत झालेल्या वादंगाचा अहवाल मागितला आहे, तो अद्याप मिळालेला नाही, मिळाल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असे सावंत म्हणाले. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेविका लता राजगुरू, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी संगीता तिवारी, नीता परदेशी आदी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)