गौरीशंकर घाळेमुंबई : धर्मादाय संस्था, सेवाभावी ट्रस्टच्या नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर एका दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यभरातील सर्व धर्मादाय उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना परिपत्रकामार्फत जारी केले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयामुळे लोकांचे हेलपाटे थांबणार असून, दलालांनाही चाप बसेल.राज्यात धर्मादाय संस्था किंवा ट्रस्टच्या नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रता नाही. निश्चित कालमर्यादा नसल्यामुळे अनेकदा विश्वस्तांना नोंदणीसाठी सहा-सहा महिने हेलपाटे मारावे लागतात. शिवाय, नोंदणीवेळी सर्वच विश्वस्तांना बोलावण्याच्या प्रघातामुळे संस्था आणि ट्रस्टची नोंदणी लांबणीवर पडत असे. त्यामुळे न्यास नोंदणी कार्यालयांबाहेर संस्था नोंदणी करून देणाºया एजंट आणि वकिलांची चलती होती. सामाजिक व सेवाभावी कार्याच्या उद्देशाने एकत्र येणाºयांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे हेलपाटे बंद व्हावेत यासाठी संस्था नोंदणीसाठी विहित कागदपत्रांची पूर्तता असलेल्या प्रकरणांची छाननी तातडीने करून एका दिवसात नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.धर्मादाय आयुक्तालयाने काही महिन्यांपासून संस्था नोंदणीसाठी आॅनलाइनचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आॅनलाइन पद्धतीने संस्था नोंदणी करण्याचे प्रमाणही हळूहळू वाढत असल्याची माहिती धर्मादाय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.अहवालही मागवलानोंदणीसाठी विश्वस्तांचे अधिकृत प्रतिनिधी किंवा नियुक्त वकिलांचे म्हणणे ग्राह्य मानून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. सर्वच विश्वस्तांना कार्यालयात हजर व्हायला सांगू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. अपवादात्मक परिस्थितीत नोंदणीला तीन दिवसांचा अवधी मान्य केला जाईल, असे सांगत या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.महाराष्ट्रात सुमारे आठलाख नोंदणीकृत धर्मादाय संस्था, सेवाभावी ट्रस्ट आहेत. दररोज सुमारे १५०-२०० संस्थांच्या नोंदणीसाठी अर्ज दाखल होत असतात.
आता एका दिवसात होणार ‘ट्रस्ट’ची नोंदणी, विश्वस्तांचे हेलपाटे वाचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 5:39 AM