अमरावती : शासनामार्फत घेण्यात येणा-या विविध विभागांच्या शैक्षणिक प्रवेश परीक्षा आणि भरती परीक्षांसाठी यापुढे आता माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले ‘महापरीक्षा’ हे एकच संकेतस्थळ राहणार आहे. परीक्षा अर्ज भरण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंतचे सर्व टप्पे आता या एकाच संकेतस्थळाच्या माध्यमातून पार पडतील, अशी माहिती स्पर्धा परीक्षातज्ज्ञांनी दिली.
शासनाद्वारे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक परीक्षा घेण्यात येतात. त्यानंतर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. या प्रत्येक परीक्षेसाठी आतापर्यंत स्वतंत्र संकेतस्थळे होती. मात्र, आता १ आॅक्टोबरपासून सर्व परीक्षांसाठी एकच संकेतस्थळ वापरणे बंधनकारक केले जाईल. सद्यस्थितीत अनेक भरतीपरीक्षा ‘आॅफलाईन’ पद्धतीने घेण्यात येतात. बहुपर्यायी प्रश्नांच्या या परीक्षांमध्ये बहुधा गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे माहिती, तंत्रज्ञान विभागाने महापरीक्षा हे संकेतस्थळ तयार केले आहे. परीक्षा घेणा-या विभागाची तसेच विद्यार्थ्यांच्या नोंदणीसह प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा केंद्रांची निश्चिती, परीक्षकांची नियुक्ती, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी, निकाल जाहीर करणे, ही सर्व प्रक्रिया याच संकेतस्थळाच्या माध्यमातून केली जाईल, असेही तज्ज्ञांनी सांगितले. प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळे अर्ज करताना वेगवेगला 'डिमांड ड्राफ्ट' (धनाकर्ष) काढून स्वतंत्र अर्ज करावा लागत असे. आता एकाच संकेतस्थळामुळे एकाच वेळी माहिती घेता येईल.