सातारा - भाजपाने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत साताऱ्यात नेमणूका करू लागलेत. हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानी गादी आहे असं विधान करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार छ. उदयराजने भोसले, आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर खोचक टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रतापसिंह महाराजांनी स्वाभिमानासाठी ब्रिटिशांसमोर जो त्याग केलेला आहे. ते झुकले नाहीत आणि ते वंशज आहेत त्यांनी भाजपासोबत जी तडजोड केली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल इतिहासाला कदापि मान्य होणार नाही असं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या राजघराण्यावरील टीकेवर साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी संताप व्यक्त करत राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे?खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यास राज्यात कोणीही महत्त्व देत नाही. साताऱ्याच्या छत्रपती घराण्याबाबत कळवळा दाखवण्यापूर्वी त्यांनी या घराण्याबाबत आपली अगोदरची वक्तव्येदेखील आठवावीत. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागताना अन् कोल्हापूरच्या संभाजीराजे यांना दिलेला शब्द फिरवून तिकीट नाकारताना राजघराण्याबद्दलचा आदर कुठे गेला होता? त्यांना छत्रपती घराण्याबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.
राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा काहींचा स्वभावच विकृत असतो. परंतु, या विकृतीची जेव्हा वाढ होते, त्यावेळी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. तुमचा उरला सुरला पक्ष वाढवण्यासाठी जरूर काम करावे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, राऊत यांना महत्त्व देत नाही. अशा प्रवृत्ती व्यक्तिकेंद्रित आहेत. परंतु, त्यांनी मोजून-मापून वक्तव्य केले पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवरच आज भारत सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. दुसयावर शिंतोडे उडवले म्हणजे तुम्ही फारमोठे होता असे नाही. लोकांना एकत्र ठेवणे महत्त्वाचे असते. तोडफोड करायला जास्त अक्कल लागत नाही. लोकशाही मानता, मग जाती-धर्मात का मतभेद आहेत? ज्यांच्यावर टीका केली. त्यांच्याच मांडीला मांडी लावून का बसता? विकृत लोक सत्तेत राहण्यासाठी काहीही गरळ ओकत असून, ही निर्लज्जपणाची हद्द असल्याची टीका खा. उदयनराजेंनी केली.