राकेश कदमसोलापूर : केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानातून महापालिका आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील २७० ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग व कूपनलिकांचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. जन्मदाखल्यासोबत पालकांना झाडांची भेट देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
केंद्र शासनाने पाणीटंचाई असलेल्या भागात मृद व जलसंधारण उपाययोजना करण्यासाठी जलशक्ती अभियान सुरू केले आहे. या अभियानात सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका या अभियानात सहभागी आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यात जलसंरक्षण, पारंपरिक आणि इतर पाणी स्रोत नूतनीकरण, कूपनलिका पुनर्भरण, वनीकरण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. महापालिकेने शहरातील २७० इमारती आणि कूपनलिकांची माहिती जीवन प्राधिकरणाकडे दिली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग करून या कूपनलिकांचे पुनर्भरण करण्यात येईल. अमृत योजनेतील ६१ लाख रुपयांचा निधी या कामांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. जीवन प्राधिकरणाकडून या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. महापालिकाही या निविदेच्या प्रतीक्षेत आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी याच आठवड्यात ही निविदा काढण्याबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत.
मुलांसोबत झाडांनाही सांभाळा - जन्मदाखल घेण्यासाठी येणाºया पालकांना दाखल्यासोबत एक झाड भेट देण्याचे नियोजन सुरू आहे. पालकांनी आपल्या मुलाप्रमाणेच या झाडाचेही संगोपन करावे. हवे तर या झाडांना त्यांनी नावेही द्यावी, पण आपल्या शहराच्या भविष्यासाठी या झाडांचे संगोपन करावे, अशी यामागची भावना आहे. लवकरच या उपक्रमाला सुरुवात होईल, असेही मायकलवार यांनी सांगितले.
छतावर पडणारे पाणी अडविणे - राज्य सरकारच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत शहरात ३० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्याची निविदा काढण्यात आली होती. परंतु, एकही मक्तेदार यासाठी पात्र ठरला नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे मायकलवार यांनी सांगितले.
या ठिकाणी होणार काम - शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, शासकीय इमारती, मॉल, शाळेच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम करण्यात येईल. बुद्धविहार, मरिआई मंदिर, हनुमान मंदिर, मशीद, तालीम, खंडोबा मंदिर, मलकारसिद्ध मंदिर, दर्गाह अशा २७० ठिकाणांची यादी महापालिकेने जीवन प्राधिकरणाला दिली आहे.